Wednesday, June 16, 2010

नर्मदायात्रीकडून अनमोल सदाव्रत


लोकसत्ता रविवार 13 जून 2010
नर्मदायात्रीकडून अनमोल सदाव्रत
परधर्मसहिष्णुता, आतिथ्यशीलता, आपत्ती झेलण्याची सहनशक्ती, पोटात माया व आपुलकी, पुनर्जन्म संकल्पनेतून व्यक्त झालेली मानवी जीवनाच्या शाश्वतीबद्दलची खात्री हे भारतीय संस्कृतीचे मुख्य मानदंड. हे आणि अशासारखे सगळे आपण नेहमीच वाचतो. पण डोंगरदऱ्यांमधून जंगल वस्त्यांमधून जगणाऱ्या वनवासी भारतीयांच्या रोजच्या जीवनाशी हे कसे पूर्णपणे एकरूप झाले आहे ते कळायचे असेल तर भारती ठाकूरांनी लिहिलेले नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्राहे पुस्तक वाचायलाच हवे. शहरी जीवनातले ताणतणाव, रोजच्या अस्तित्वासाठी चाललेली ससेहोलपट यामुळे दोनच पिढय़ा आधीच्या दैनंदिन आयुष्यक्रमाचा भाग असलेले हे मौलिक संस्कृतीविशेष आता केवळ अंधुक आठवणींच्या रूपात उरले आहेत. आमच्या त्या काळच्या दातृत्वाच्या, त्यागीवृत्तीच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या संस्कारांचे पुन:स्मरण अत्यंत प्रवाही आणि रंजक रूपकांद्वारे या पुस्तकातून आपल्याला होते.
चित्र रंगवता रंगवता चित्रकार थोडे मागे सरून चित्रांचे पुनरावलोकन करतो. चित्र परिपूर्ण होण्यासाठी त्याचा सतत पुन:विचार, त्याकडे स्वत: तटस्थपणे टीकाकाराच्या चष्म्यातून पाहणे आणि त्यातून निर्दोष कलाविष्काराकडे वळणे ही निर्मितीतली प्रगत अवस्था असते, ‘सखी’  या लेखिकेने कल्पिलेल्या मानससहचरीची काहीशी अशीच असलेली भूमिका या पुस्तकाचे एक खास आकर्षण आहे. पुस्तकभर बाजूने वाहणाऱ्या नर्मदामाईच्या संथ पाण्यावर, लेखिकेच्या परिक्रमेत घडलेल्या प्रसंगांमुळे, भेटलेल्या भल्याबुऱ्या माणसांमुळे अनेक विचारतरंग उभटतात. सखीच्या सटीप पण खुमासदार उद्गारांमुळे त्या तरंगांचे वर्तुळ विस्तारते आणि पुन:प्रसारित होते. बरेच दिवसांनंतर संस्कृतात आणि जुन्या मराठी साहित्यात गाजलेला स्वगतहा साहित्यविशेष या पुस्तकात पुन:पुन्हा भेटतो. निसर्गवर्णनं, प्रवासवर्णनं आणि त्यापलीकडची गोनीदांची अजरामर साहित्यकृती यांनी नर्मदामाईची पूजा बांधलेलीच आहे. त्यात या पुस्तकाला एक अध्यात्मिक बैठकही लाभली आहे. ओघवत्या शैलीत आणि रोजच्या उदाहरणांमधून सूचक अशा विचारांना, योग्यायोग्य काय त्याच्या निर्देशाला संग्राह्य़ स्वरूप मिळालेले आहे. जीवनदर्शी बोधचित्रांनी ते सजवले आहे.
लेखिकेला अनेक वर्षांची त्यागमय, निर्मोही, करारीपण मृदू अशा स्वभावाची पाश्र्वभूमी मिळाली आहे, नव्हे तिनेच ती निग्रहाने व निश्चयाने मिळवली आणि सिद्ध केली आहे.
प्रत्ययकारी संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी साहित्य वाचून परिपक्व झालेले मन, त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनाला पटेल तसा स्वत:चा जीवनपट लिहून तसे जीवन जगण्याची मनस्वी जिद्द यामुळे एकीकडे कलासक्त, त्याबरोबरच लहानपणापासून पहाटे स्तोत्रपठनात वंदे मातरमहे राष्ट्रगीत म्हणण्याची शिस्त असे हे अभूतपूर्व रसायन आहे. स्वच्छ पारदर्शी काचेतून अनेक पैलू असलेला स्फटिक घडवला तर त्यात शिरणाऱ्या प्रत्येक तेजाच्या किरणांचा अनेकरंगी विस्फोट होतो. सर्वदूर सप्तरंगांची पखरण होते. लेखिकेच्या लिखाणात नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने विचारमंथन करताना अशीच काहीशी किमया झालेली दिसते.
नद्यांच्या पुराच्या पाण्याचे नियोजन आणि त्यामुळे झालेला संस्कृती विध्वंस हा नेहमीच एक लोकक्षोभाचा विषय झालेला आहे. कंबोडिया, भारत, इजिप्त, चीन, द. मेक्सिको अशांसारख्या प्राचीन संस्कृतींमध्ये फिरणारे मानवनिर्मित धरणे व कालव्यांच्या संदर्भात निर्मिती-विनाशाचे हे कालचक्र सर्वपरिचित आहे. चीनच्या पूर्ण झालेल्या तीन खोऱ्यांच्याजगड्व्याळ प्रकल्पात त्यांच्या तीस अतिप्राचीन संस्कृतीचे जलसमर्पण झाले. बेताच्या आर्थिक परिस्थितीतल्या या लोकबहुल देशाने उणीपुरी तीस वर्षे या परिस्थितीचा साधकबाधक ऊहापोह केला आणि शेवटी आर्थिक सत्यापुढे मान टाकली. काहीही वाचवता आले नाही.. मोजक्या स्मारकांखेरीज.
लेखिकेने जलार्पण होणाऱ्या (आता बुडालेल्या) गावांबद्दल, जंगलांबद्दल, शेती आणि जनावरांच्या एकूणात जवळून पाहिलेल्या सर्व संपन्न संस्कृती विनाशाबद्दल मनात झालेली कालवाकालव व्यक्त केली आहे. यापुढे वाढून ठेवलेले संकट असे की, मागे उरलेल्यांना बुडालेल्या सर्वाचा, त्यांच्या आतिथ्यशील मृदू, ऋजू स्वभावाचा, त्यांच्या अत्मसंतुष्ट पण मानी स्वभावाचा विचारपूर्वक खर्च करण्याचा विसर पडला तर वाचवण्यासारखी अनेक जीवनमूल्ये होत्याची नव्हती होतील आणि त्याचे परिणाम दूरगामी असतील.
असा त्यांचा विसर पडू नये असे वाटत असेल, तर या आणखी यासारख्या इतर प्रत्ययी पुस्तकांचा इतर भाषांमध्ये, इतर संस्कृतीमध्ये प्रसार व्हायला हवा. पुढच्याला बसलेली ठेच किती जिव्हारी बसली त्याचे प्रभावी चित्रण तर या पुस्तकात आहेच, पण अशा साहित्यकृतींमध्ये पुढच्याला शहाणपण सुचवण्याचे ऐतिहासिक कर्तव्य पार पाडण्याचे सामथ्र्य आहे.
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा
भारती ठाकूर
गौतमी प्रकाशन
पृष्ठे- २६१, मूल्य- २०० रुपये
शशिकांत जागीरदार