नर्मदा परिक्रमा- माणुसकीचं संचित
सौ. भाग्यश्री कुलकर्णी
http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/bookreview/0909/11/1090911045_1.htm
वास्तविक आतापर्यंत नर्मदा परिक्रमा या विषयावर बरेच काही लिहिले गेले आहे. मराठीत जगन्नाथ कुंटेंचे किंवा अमृतलाल बेगड यांचे अनुवादित पुस्तकही आले आहेत. तरीही प्रत्येकाला भावणारी नर्मदा वेगळी असते. नाशिकच्या भारती ठाकूर आणि त्यांच्या निवेदिता खांडेकर व उषःप्रभा पागे या दोन मैत्रिणींना दिसलेली आगळी नर्मदा 'नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा' या पु्स्तकातून सामोरी येते. नर्मदेभोवती धार्मिक अवगुंठन असले तरीही तिला त्यात बंदिस्त न करता, तिच्याकाठी नांदणारी संस्कृती, समाजवास्तव आणि तिथला निसर्ग भारतीताईंनी टिपला आणि ते सारं या पुस्तकात मांडलं आहे. दैनंदिनीची छटा असलेलं हे लिखाण एका पुस्तकात बांधले आहे आणि नर्मदेच्या प्रवाहासारख्या लेखणीमुळेच ते वाचनीयही झाले आहे.
अमरकंटकपासून सुरू झालेली ही यात्रा म्हणजे दुर्दम्य माणुसकीच्या अनुभवांचे एक संचितही आहे. एरवी शहरी जीवनात हरवलेली किंवा सहसा न सापडणारी माणुसकी नर्मदेच्या काठावर मात्र लेखिकेला विपुल प्रमाणात सापडली. याचा अर्थ वाईट अनुभव आलेच नाहीत, असे नाही. पण एकुणात हे अनुभव म्हणजे नर्मदेच्या प्रवाहातले अपवादात्मक गढूळ पाणी. बाकी स्वच्छ, नितळ मनाची ही माणसं भारतीताईंची परिक्रमा सुसह्य करतात. पण त्यांच्या मदतीतून त्यांचा स्वतःचा जीवनपटही उलगडत जातो.
भारतीताईंना भेटलेली साधी, अत्यंत गरीब पण मनाने फार श्रीमंत असणारी माणसे आपल्याला आपली जागा दाखवून देतात. आपल्या दाराशी आलेला याचक बघताच त्याच्या हेतुविषयीच पहिल्यांदा आपण शंकीत होतो, पण नर्मदेच्या तीराभोवतीच्या काठावरची गोरगरीब मंडळी मात्र परिक्रमावासीयांना बघून, माताजी, माताराम म्हणत किती मदत करतात, याची ह्रद्य वर्णनं या पुस्तकात आहेत. स्वतःकडे अन्नाची कमतरता असतानाही केवळ परिक्रमावासीयांना मदत करून पुण्य कमावण्याच्या सात्विक आनंदापोटी ही मंडळी जे काही करतात, त्याने आपल्या खुजेपणाची जाणीव गडद होते.
परिक्रमेच्या मार्गावर पडणारी गावं अतिशय साधी आहेत. त्यांचे जीवनही कष्टाला बांधले गेलेले आहे. त्यांचे सामाजिक वास्तवही वेगळे नाही. पण त्यातही कुठेतरी नवीन विचारांचे बीज पडल्याचेही दिसून येते. गरीबीतही टुकीने संसार करून परिक्रमावासीयांना मदत करणारे अनुभव जसे ह्रद्य आहेत, तसेच नित्यकामात अडकलेल्या स्त्रियांची दुःखेही त्यांना दिसली. या तिघीही स्त्रियाच असल्याने अनेक जणी त्यांच्यापुढे मोकळ्याही झाल्या. आपले भोग सांगून हलक्या झाल्या. पण स्त्रियांचे केवळ हेच रूप या परिक्रमेत दिसले असे नाही. एका आदिवासी तरूणी या तिघींनी जेवायला बोलावले. त्यावेळी घरच्यांची परवानगी घेतली का का असा प्रश्न विचारल्यावर 'त्यांना काय विचारायचे?' असे सांगून, निर्णयाची 'दोरी' आता ग्रामीण स्त्रियांच्या हातातही यायला लागली आहे हे वास्तवही त्यातून दिसून येते. अनेक साधू-साध्वीही या काळात त्यांना भेटले. त्यांची जीवनपद्धतीही जवळून पहायला मिळाली. परिस्थितीतून आलेल्या साध्वीपणातूनही उचंबळणारी माया आणि हेच भगवे कपडे नेसून आलेले तुटक कोरडेपणही त्यांना अनुभवायला मिळाले.
भारतीताईंची भाषाही फार सोपी आणि प्रवाही आहे. वाचताना जणू चित्रफितच डोळ्यांसमोर फिरतेय, असा भास होतो. म्हणूनच निसर्गाचे वर्णनही कधी नीरस होत नाही. आजूबाजूचा निसर्ग, तिथले प्राणी-पक्षी त्यांची नावे आणि इंग्रजी नावेही त्या देतात. या सगळ्या पसार्यात बाजूला असलेल्या नर्मदेचा हातही कधी सुटत नाही. म्हणूनच निसर्गाबरोबरच नर्मदामय्याची बदलती रूपही त्या टिपत जातात.
नर्मदेवर बांधण्यात येणार्या धरणामुळे विस्थापित होणार्यांचे वास्तव, त्याचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम लेखिका अगदी परीणामकारकरित्या आपल्यापर्यंत पोहोचवते. त्यातला ज्येष्ठ वृद्धांचा प्रश्न तर डोळ्यातुन पाणीच काढायला लावतो. शहरी जीवनातील संकल्पना, जगण्यातले टोकाचे आग्रह, खाण्याच्या सवयी, स्वामित्वाची भावना, आपणच वाढवलेल्या आपल्या गरजा ह्या सगळ्यांची जाणीव पुस्तक वाचताना जागोजागी होत रहाते. हे असतानाही परिक्रमेत शारीर तसेच मानसिक दृढतेच्या कमाल पातळ्यांचा कस लागणार्या घटनाही शहारे आणतात.
एरवी आपल्या सुरक्षित जगात वावरताना किती अकारण आणि अवाजवी गोष्टींचा संग्रह करत असतो हे ते वाचताना वारंवार जाणवते. सुरक्षित जगात वावरतानाही आपण जेवढे निवांत नसतो, त्याहूनही अधिक निवांत आपण त्या परिक्रमेत असतो, हे भारतीताई दाखवून देतात. स्वत:कडे कोणताही संग्रह नाही. उद्या काय घडणार आहे त्याची शाश्वती नाही. एवढेच काय पण जेवणासाठीचीही तरतुद नाही, असे असतानाही कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्या भरवशावर आपण पुढे जात असतो. वाटेतल्या सगळ्या संकटाची काळजी घेणारा 'तो' कोणत्या ना कोणत्यातरी रुपात आपली काळजी घेतो. मनातल्या 'बाळबोध' वाटणार्या इच्छाही तो पूर्ण करतो, याचा प्रत्ययही पदोपदी भारतीताईंना आला.
यात्रा सुफळ संपल्यानंतर एका स्वामिजींशी झालेल्या बोलण्यात परिक्रमेने काय मिळवलं, यावर ते स्वामीजी जे सांगतात, ते फार चिरंतन आहे. ' एरवी आपण आपल्या आयुष्यात एक निश्चित, आखीव रेखीव जगत असतो. पण तरीही निश्चिंत नसतो. इथे परिक्रमेत तर उद्या काय होईल, खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. तरीही काही सुखरूप पार पडतं. किंबहूना तो प्रश्नही मनात उभा रहात नाही. ही निश्चिंतता हेच प्रारब्ध असतं.'
आणि हो, या सगळ्या परिक्रमेत, भारतीताईंच्या मनातली सखीही त्यांची साथसोबत करत होती. वेळोवेळी आपली मते, विचार मांडत होती. गुजगोष्टी करत होती. भारतीताईंना या यात्रेतून कशाचा शोध घ्यायचा नव्हता. आजूबाजूला भेटणार्या माणसातून, निसर्गातून आणि विविध गोष्टीतून परमेश्वर त्यांना 'दर्शन' देतच होता. या सगळ्या बाह्यजगतातल्या घडामोडींचा प्रवास भारतीताईंच्या मनातही सुरूच होता. म्हणूनच या पुस्तकाला दिलेले अंतर्यात्रा हे उपशीर्षक अगदी समर्पक आहे. पुस्तकातली धनंजय गोवर्धनेंची रेखाटनेही छान आहेत. आणि चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठही समर्पक.
नर्मदा परिक्रमेवरचं हे पु्स्तक नक्कीच वाचायला हवे.
---
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा
लेखिका- भारती ठाकूर
गौतमी प्रकाशन, नाशिक
किंमत- २०० रूपये
No comments:
Post a Comment